Special Report Sharad Pawar - Ajit Pawar | पुन्हा एकदा हातमिळवणी,काका-पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पहिले काही महिने अजित पवार हे त्यांचे काका शरद पवारांना जाहीर व्यासपीठावर भेटणं टाळत असल्याचं चित्र होतं. अनेकदा एका कार्यक्रमात असूनही दोन्ही नेते एकमेकांकडं पाहायचेही नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांत या दोन नेत्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्याचं चित्र दिसतंय. आज तर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या बैठकांना एकत्र हजेरी लावली. त्यामुळं ठाकरे बंधुंच्या जुळवाजुळवीसोबत पवार कुटुंबाच्या जुळवाजुळवीची चर्चाही सुरु झालीय. पाहूया, याविषयाचा सविस्तर रिपोर्ट.
शरद पवार आणि अजित पवार.. वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असणारे पण कौटुंबिक जिव्हाळा जपणारे महाराष्ट्रातले काका आणि पुतणे आजकाल पुन्हा पुन्हा एकमेकांना भेटतायत. आज तर या दोघांनी सलग दोन वेगवेगळ्या बैठकांना एकत्रित हजेरी लावली. अगोदर साखर संकुलाच्या बैठकीला हे दोघं हजर राहिले. या बैठकीत पवार काका-पुतणे अडीच तास एकत्र होते. साखर संकुलातल्या या साखरपेरणीची चर्चा सुरु असतानाच वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांसह काका पुतण्याची वेगळी बैठकही पार पडली. राजकीय चुली वेगळी होऊनही वारंवार होणाऱ्या या भेटींमागे यशवंतराव चव्हाणांची शिकवण असल्याचं अजितदादा सांगतायत.